गोवा विद्याप्रसारक मंडळ, डॉ. दादा वैद्य शिक्षण महाविद्यालयात २ मार्च २०२२ रोजी जागतिक मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिक्षक, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अशी बहुआयामी ओळख असलेले श्री. गोपीनाथ गावस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी विभागातील द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मराठी गौरव गीताने कार्यक्रमाचि सुरूवात झाली. प्रमुख पाहुणे श्री. गोपीनाथ गावस आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोजेन मॅथ्यू यांचे पुष्प प्रदान करून स्वागत करण्यात आले. मराठी विभाग प्रमुख श्री. समीर नाईक यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थिनी कु. गौरी नाडकर्णी हिने मराठी भाषा दिवसाबद्दल माहितीपर असे भाष्य केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोजेन मॅथ्यू यांनी मराठी भाषेची काही वैशिष्ट्ये आपल्या भाषणातून नमूद केली. त्याचबरोबर कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेसाठी केलेल्या कार्याचा देखील त्यांनी पुरस्कार केला. प्रमुख पाहुणे श्री. गोपीनाथ गावस यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचा संदेश उपस्थितांना दिला. “भाषेच्या समृद्धीची जबाबदारी नवीन पिढीवर असते आणि रोजच्या वापरात असलेली भाषाच अधिक समृद्ध बनते. त्यामुळे केवळ मराठी दिनापुरताच नव्हे, तर तुमच्या दैनंदिन जीवनातही मराठी भाषेचा वापर होऊ द्या” असे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या नंतर कविता सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. बहुतेक विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कविता सादर केल्या. तर काहींनी स्वरचित कविता सादर केल्या. कु. दिव्या चंद्रेकर आणि कु. दिक्षा कलंगुटकर यांनी एकपात्री सादरीकरणे केली. या कार्यक्रमा-दरम्यान मराठी भाषेशी निगडीत काही प्रश्न उपस्थितांना विचारण्यात आले होते आणि विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. समीर नाईक, विद्यार्थिनी कु. हर्षा गणपुले आणि कु. दिक्षा कलंगुटकर यांनी संगीत मैफिल सादर केली. लोकप्रिय नाट्यगीते आणि अभंगांच्या सुरेल गायनाने परिसर मंत्रमुग्ध झाला. कु. दिव्या सावंत हिने आभार प्रदर्शन केले. सामूहिक पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, प्रथम आणि द्वितीय वर्ष विद्यार्थी आणि काही ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कृतिका नाईक आणि कु. संतोषी वायंगणकर यांनी केले.